“सातारा सैनिक स्कूलवरील आरोप निराधार’

सातारा – देशातील संरक्षण मंत्रालयाअंतर्गत नियंत्रण असलेल्या दिल्लीतील सैनिक स्कूल सोसायटीमार्फत इयत्ता पाचवी व नववीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या संदर्भाने त्रयस्थ व्यक्तिंकडून सातारा येथील सैनिक स्कूलविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पालकांनी या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन सैनिक स्कूलच्या प्राचार्या कॅप्टन मनीषा मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केले.

सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेच्या गुणांकनात फरक पडल्याचा आरोप करत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी दुपारी सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वाराचा मार्ग रोखला होता. सैनिक स्कूल व्यवस्थापना कडूनही याबाबत कोणतीच बाजू मांडली गेली नव्हती.  मात्र, शनिवारी प्राचार्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्याध्यापिका मिश्रा म्हणाल्या, “”सातारा सैनिक स्कूल व सोसायटी यांच्या विरोधात करण्यात आलेले आरोप निराधार व खोटे आहेत.

सैनिक स्कूल व सैनिक स्कूल सोसायटी यांच्याविषयी कोणतीही शंका अथवा संदेह पालकांनी मनात ठेवू नये.” सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा पालकांचा संशय आहे. याबाबत विचारले असता प्राचार्या मिश्रा म्हणाल्या, “”सैनिक स्कूलशी संबंधित नसलेल्या त्रयस्थ व्यक्तिंकडून इच्छुक पालकांची प्रवेशाबाबत दिशाभूल करुन फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने फसवणूक टाळावी, यासाठी सैनिक स्कूलतर्फे परीक्षेच्या आधी आवाहनही करण्यात आले होते. परीक्षा प्रक्रियेमध्ये सैनिक स्कूलचे कोणतेही नियंत्रण अथवा हस्तक्षेप नसतो.” ज्या पालकांची तक्रार आहे, त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.