नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी लवकरच निर्णय

शरद पवार यांची ग्वाही; घाबरू नका, बाळासाहेब पाटील हायकोर्ट आणि मी सुप्रीम कोर्ट

वाई – पूर्वीच्या शासनाने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली. आम्ही दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला. तरीही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावर राज्य शासनाने निर्णय घेण्यासाठी मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली असून नियमित कर्ज भरणारांसाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

सध्याच्या कर्जमाफीसाठी 29 हजार कोटीची तरतूद करावी लागणार असून यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तरीही जाईल तिथे सरसकट कर्जमाफीचे काय, अशी विचारणा होत आहे. तुमच्या समस्या ऐकण्यासाठी जिल्ह्यातीलच असलेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हायकोर्ट असून त्यांच्याकडून योग्य निर्णय होईलच. परंतु, न झाल्यास घाबरू नका, मी सुप्रीम कोर्ट आहे. तुमचे सर्व प्रश्‍न मार्गी लावले जातील., अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वाई येथील विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन प्रसंगी पवार बोलत होते. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आमदार मकरंद पाटील, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, बॅंकेचे संचालक नितिन पाटील, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शरद पवार म्हणाले, “”सातारा जिल्हा बॅंकेची वाटचाल कै. आबासाहेब वीर व लक्ष्मणराव पाटील यांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे देशपातळीवर प्रगतीपथावर आहे. 1949 मध्ये बॅकेची स्थापना होऊनही इतर जिल्हा बॅंकेपेक्षा अग्रगण्य आहे. सहकारातील राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. वाई विभागीय कार्यालय इमारतीस कै. लक्ष्मणराव पाटील सहकार सदन नाव देण्यात यावे.” यावेळी रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “”सध्या फलटणची संस्कृती बिघडत चालली आहे. थकबाकीतही फलटण तालुका अग्रेसर आहे.

कै. आबांनी घालून दिलेली शिस्त तुम्ही पाळता म्हणून बॅंक अग्रेसर आहे. त्यामुळे आमची कॉलर टाईट आहे, आम्ही कॉलर उडवत नाही. शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती करावी. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही.” पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळेच आले असून राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना सुरू केली असून मागील शासनाच्या कर्जमाफीमध्ये आलेल्या अडचणी आम्ही येऊ देणार नाही व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करू.’

बॅकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “”बॅकेच्या जडणघडणीत कै. आबासाहेब वीर, विलासकाका उंडाळकर, कै. अभयसिंहराजे भोसले व कै. लक्ष्मणराव पाटील यांचे योगदान मोठे आहे. बॅक ठेवी, कर्जे याचें गुणोत्तर उत्तम आहे. एनपीए शून्य टक्‍के आहे. ऑडिट वर्ग “अ’ आहे.” बॅकेचे विभागीय कार्यालय वाईमध्ये व्हावे हे लक्ष्मणराव पाटील यांचे स्वप्न होते. विभागीय कार्यालयाची जागा खरेदी विक्री संघाची असून ही जागा जिल्हा बॅकेला दिल्याने संघ उर्जितावस्थेत आला व आज खरेदी विक्री संघ लाखो रूपयांची उलाढाल करू लागला आहे, असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सत्यजित पाटणकर, राजेश वाठारकर, दत्तानाना ढमाळ, वसंत मानकुमरे, अनिल देसाई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरूणादेवी पिसाळ, शशिकांत पिसाळ, वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पंचायत समिती सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विकांत डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दीपक बाबर आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते ना. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, उदय कबुले, सुनील माने यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले. प्रभाकर घार्गे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले.

“बाबा, तुम्ही राष्ट्रवादीत या’
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रास्ताविक करून खाली बसत असताना उपस्थित श्रोत्यांतून एकजण उठून जोरात “बाबा, तुम्ही राष्ट्रवादीत या,’ असे म्हणत मान्यवरांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्याने हशा पिकला.

मकरंद पाटलांना योग्य वेळी संधी
नवीन सरकार स्थापन होताना आमदार मकरंद पाटीलही मंत्रिपदाच्या स्पर्धेत होते. पण सरकार तीन पक्षांचे असल्याने काही मर्यादा पडल्या. एकीबरोबर संसार करताना अडचणी येतात. इथे तर तीन-तीन जण एकत्र आहोत. परंतु, तुमची भावना आम्ही जाणतो. आ. मकरंद पाटील यांना योग्य वेळी न्याय देऊ, घडयाळाचा काटा चुकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.