वडूज – भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनवेळी महाविकास आघाडीचा धिक्कार असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक वचन शहा, जयवंत पाटील, अजय शेटे, संजय कुंभार, बाळासाहेब पंडोळे, विशाल महामुनी, किरण काळे, राहुल लोहार, उदय इंगळे, सूर्यकांत कोकाटे, महादेव जाधव, पांडुरंग माने, नागेश झेंडे, राजू जाधव, सचिन माने, संदीपान माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनावेळी उपस्थित होते.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये मंथली हप्ता गोळा करण्याचे काम निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वांझे यांच्यावर सोपवल्याची खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्त मा. परमबीर सिंग यांनी केले आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा तत्पर घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.