सातारा – कायदा सुव्यवस्थेची निगराणी आणि सतर्कता या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशानुसार सातारा पोलिसांनी जिल्ह्यात 42 ठिकाणी ऑपरेशन ऑल आउट राबवले. जिल्ह्यामध्ये सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधून जिल्ह्याच्या हद्दींची नाकाबंदी करण्यात आली आणि विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या ऑपरेशनमध्ये 50 पोलीस अधिकारी आणि 237 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये 228 केसेस करून एक लाख 7600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान बेकायदा दारूविक्रीच्या 22 केसेस करून 19 हजार 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान वडूज पोलीस ठाण्यांतर्गत पुण्यातील संशयित पकडण्यात आला असून एकूण 51 अजामीनपात्र वारंट बजावणी करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये 395 हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस यांची तपासणी केली एकूण 151 पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत.
यापुढे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे मालमत्तेच्या गुन्ह्यावर प्रतिबंध आणण्याकरता जिल्ह्यामध्ये सातत्याने ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.