पिंपरी – शैक्षणिक संस्थांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. शहरातील 72 ठिकाणी शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली आहे.
शहरातील विविध भागातील 72 ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसराची पाहणी महापालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने केली. टपरी, चहाविक्रीची ठिकाणे, पत्राशेड, खाजगी जागा, बंदिस्त गाळे, भाजी विक्री केंद्र आदींची तपासणी करण्यात आली. संशयास्पद वाटलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला.
तंबाखूच्या धोक्यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शाळेच्या शंभर मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे. तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा, 2003 च्या तरतुदींनुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखू उत्पादनांची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 8 विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 4 विक्रेत्यांच्या टपऱ्या देखील हटवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची कारवाई इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये देखील सुरू आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक आणि महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची संयुक्त पाहणी केली. तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणाऱी 72 ठिकाणे यात आढळून आली. सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 325 गुन्हे दाखल केले आहेत.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे म्हणाले, महापालिका आणि पोलीस दलाच्या माध्यमातून शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेऊन शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास महापालिकेच्या शिक्षण विभागास तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबतची माहिती द्यावी. अशा नागरी सहभागामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास निश्चितपणे हातभार लागेल.