पुणे – पुणे लीग कबड्डी स्पर्धेत वेगवान पुणे, माय मुळशी तसेच छावा पुरंदर संघांनी आपापले सामने जिंकत विजयी सलामी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज करंडक व पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते पार्थ अजित पवार व जय अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजोग वाघेरे, वीरधवल जगदाळे, वासंती बोर्डे, कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, संयोजक समिती अध्यक्ष किरण चांदेरे, सतेज संघाचे अध्यक्ष अर्जुन शिंदे, राहुल बालवडकर, सोमनाथ धनकुडे, नासिर सय्यद, माणिक गांधिले, दत्तात्रय झिंजुर्डे, प्रकाश पावर, नितीन कळमकर, सागर बालवडकर, राजेश ढमढेरे, पूनम विशाल विधाते, माजी रोहीणी चिमटे, प्रमोद निम्हण, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच प्रमुख दीपक धावडे आदी उपस्थित होते.
पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात माय मुळशी संघाने झुंजार खेड संघावर 57- 27 अशी मात करीत दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला माय मुळशी संघाकडे 34-10 अशी जवळजवळ निर्णायक आघाडी होती. त्यामुळे हा सामना एकतर्फी होणार हे निश्चिच झाले होते. मध्यंतरानंतर माय मुळशी संघाच्या सुरेंद्र कडलगे व विजय मोहिते यांनी आपल्या चढाया अधिक आक्रमक करीत विजय सोपा केला. त्यांना कृष्णा जगताप व आकाश दिसले यांनी सुरेख पकडी केल्या.
स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान पुणे संघाने बलाढ्य बारामती संघावर 50-25 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला वेगवान पुणे संघाने 23-11 अशी चांगली आघाडी घेतली. वेगवान पुणे संघाच्या अजय सोळंकी व अमरजीत चौहान यांनी चौफेर चढाया करीत आपले कौशल्य दाखवित वेगवान खेळ केला आणि मैदान गाजविले. त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात छावा पुरंदर संघाने शिवनेरी जुन्नर संघावर 46-38 अशी मात करीत विजय मिळविला.
अन्य सामन्यात सिंहगड हवेली व लय भारी पिंपरी चिंचवड संघाचा सामना 46-46 समान गुणांवर संपला. या सामन्यात प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह भरला होता व या सामन्याने प्रेक्षकांचे पारणे फेडले. मध्यंतराला सिंहगड हवेली संघाकडे 28- 21 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर लय भारी पिंपरी चिंचवड संघाच्या सागर सभाम व आर्यन राठोड यांनी जोरदार आक्रमण करीत आपल्या संघाला बरोबरी साधुन दिली.