पुसेगाव,(प्रतिनिधी) – डिस्कळ, ता. खटाव येथे दि. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास इयत्ता 5 वीत शिकणार्या शिवहरी अनंता रजपूत (हल्ली रा. डिस्कळ, मूळ रा. अमोना, पो. शेळगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा) याला छोटा हत्ती (एमएच-12-यूएम-1814) या वाहनाने धडक दिली होती. या अपघातात शिवहरीला गंभीर दुखापत होऊन, त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर शिवहरीला कोणतीही मदत न करता पळून गेलेला वाहनचालक शिवगोपाल मनोजकुमार (रा. सिक्टा, ता. डुमरीयागंज, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला पुसेगाव पोलिसांनी आज अटक केली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात ‘हिट अँड रन’चा गुन्हा 7 जानेवारीला दाखल होता.
या अपघातातील वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांनी सपोनि आशिष कांबळे यांना दिली होती. त्यानुसार कांबळे यांनी तपास पथक तयार केले होते. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत संशयित शिवगोपाल मनोजकुमार याचे नाव निष्पन्न करून, त्याला बुधवारी अटक केली. सपोनि कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहाय्यक फौजदार धनंजय शिंदे, चंद्रकांत खाडे, हवालदार श्रीनिवास सानप, तात्यासाहेब ढोले, पोलीस नाईक अशोक सरक, अविनाश घाडगे, गीतांजली काटकर यांनी ही कारवाई केली.