वाई,(प्रतिनिधी) – नाट्यमय घडामोडींनंतर पसरणी (ता. वाई) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचदपदी बद्रिनाथ प्रदीपकुमार महांगडे यांची निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. भैरवनाथ विकास पॅनेलकडे 11 सदस्य असल्याने, त्यांचाच उपसरपंच होणार, यात कोणालाही शंका नव्हती. हे पद कोणाला मिळणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. मावळते उपसरपंच विशाल शिर्के आणि भैरवनाथ विकास पॅनेलची काही ज्येष्ठ मंडळी यांच्यामध्ये काही ठीक नसल्याचे अनेकांना जाणवले होते.
भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिळून हे पॅनेल तया केले होते. गेल्या तीन वर्षांत एकदा भाजपला आणि नंतर राष्ट्रवादीला उपसरपंचपदाची संधी मिळाली होती. मात्र, अंतर्गत वादात राष्ट्रवादीतील सदस्यांची होणारी घुसमट आणि त्यातून झालेल्या उठावामुळे गावातील राजकारणाला वेगळे वळण लागले होते. तडजोडी करणार्या पक्षातील सर्व नेत्यांविरोधात बंड करून, ग्रामपंचायत सदस्यांनी बद्रिनाथ महांगडे यांना उपसरपंचपदी निवडले. या पदासाठी बद्रिनाथ महांगडे हे अतिशय इच्छुक असल्याचे अंतर्गत झालेल्या अनेक बैठकांमधून दिसत असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांकडून सांगण्यात येत होते.
बद्रिनाथ हे राष्ट्रवादीचे सदस्य असल्याने, त्यांना विरोध होत होता. भैरवनाथ विकास पॅनेलकडून शेवटच्या क्षणी राहुल गायकवाड यांचा फॉर्म भरण्यात आला. त्याला विरोध करण्याची भूमिका विशाल शिर्के, गेणू हेरकळ, आनंद येवले, सौ. रूपाली शिर्के आणि सौ. शारदा महांगडे यांनी घेतली होती. मात्र, आपल्याकडे बळ कमी असल्याची जाणीव त्यांना होती.
स्वप्निल गायकवाड यांची एन्ट्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या सरपंच सौ. हेमलता गायकवाड व ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा पवार यांच्या सहकार्याने वातावरण बदलले आणि बद्रिनाथ महांगडे यांना लढाई सोपी झाली. भैरवनाथ पॅनेलच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांना पराजय दिसू लागल्याने, त्यांनी शेवटच्या क्षणी राहुल गायकवाड यांचा फॉर्म मागे घेत नामुष्की टाळली. त्यामुळे बद्रिनाथ महांगडे यांची उपसरपंचपदी निवड झाली.
यामध्ये धर्माजी शिर्के, संपत महांगडे,गणेश महांगडे, शिवाजी येवले, अमोल आबा महांगडे, डॉ. मंगेश महांगडे, बाबू शिर्के, गौरव महांगडे, यादव महांगडे, चंद्रकांत महांगडे, सूर्यकांत महांगडे, सागर महांगडे, उत्तम महांगडे, साहेबराव शिर्के, राजाराम मुळीक, संतोष येवले, सुनील पांचाळ, ज्ञानेश्वर येवले यांचे योगदान मोलाचे ठरले.