सातारा – छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व-धर्म-समभावची संकल्पना मांडली, आचरणात आणली आणि ती समाजमनात खोलवर रुजवली. एक तो काळ होता जेव्हा समाज हा एक कुटुंब होतं; परंतु अलिकडे लोकांना समाजाचं हीत जोपासावं असं मुळीच वाटत नाही. ‘मस्जिद परिचय’ हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरक ठरेल,’ अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.
साताऱ्यातील शाही मस्जिद येथे सातारा बैतुलमाल कमिटीच्या वतीने सर्व धर्मीयांसाठी रविवारी ‘मशीद परिचय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र, आज जर कोणी जाती-पातीच्या जोखडात अडकला तर या देशाचे तुकडे व्हायला फार वेळ लागणार नाही. मी कोणत्याही प्रार्थनास्थळांत गेल्यानंतर एवढीच अपेक्षा करतो, प्रार्थना करतो की व्यक्ती केंद्रीत झालेल्या लोकांना सुबुद्धी मिळो. मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यामागे देखील हाच हेतू आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शाही मस्जिद कमिटीचे आभार मानतो. असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करावेत.
पुणे येथून आलेले इम्तिया़ज शेख आणि करीमुद्दीन शेख यांनी या कार्यक्रमात अ़जानचा अर्थ, मस्जिदचे सामाजिक महत्त्व, तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते, त्याचे अध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व, मस्जिदच्या विविध भागांची माहिती दिली. यावेळी सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यात सलोखा कायम : आ. शिवेंद्रसिंहराजे
साताऱ्यातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी कायमच एकोपा जपला असून, ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. मस्जिद म्हणजे काय? नमाज का अदा केली जाते, यासंह अनेक प्रश्नांची माहिती मस्जिद परिचय या उपक्रमामुळे अवगत झाली, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.