पिंपरी – शहरात पाळीव प्राण्यांबरोबरच मोकाट जनावरांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही जनावरे रस्त्यावर फिरताना किंवा अपघातात जखमी होतात. त्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे प्राणी सुश्रुषा केंद्र (ऍनिमल शेल्टर) सुरू केले आहे. येथे वर्षभरात 17 हजारांहून अधिक प्राण्यांवर उपचार केले आहेत.
महापालिकेने नेहरूनगर कुत्रा, मांजर यांच्या उपचारासाठी प्राणी सुश्रुषा केंद्र (ऍनिमल शेल्टर) सुरू केले आहे. तर, भटक्या जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने पीपल फॉर ऍनिमल या खासगी संस्थेची नेमणूक केली आहे.
पाळीव प्राण्यांना वेळीच उपचार मिळू शकतात. मात्र, भटके व मोकाट कुत्रे, तसेच जनावरांना इजा, अपघातात गंभीर जखमी होणे, अतिसार व उलटी तसेच, इतर गंभीर आजारी जनावरांवर वेळेच उपचारासाठी हे केंद्र वरदान ठरत असून महापालिकेने केंद्रात पिंजरे व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेकदा अपघातात प्राणी जखमी होतात. त्यांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी 7028714111 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने केले आहे.
जनावरांसाठी लसीचे डोस
भटक्या जनावरांच्या अपघात, आजारांबाबत महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडे तक्रारी येतात. त्यांच्यावर नेहरूनगर केंद्रात उपचारासाठी तेथे आयपीडी आणि ओपोडी सुरू असून तेथे तातडीने उपचार केले जातात. तसेच प्राणी बरे झाल्यानंतर त्याला पुन्हा त्या ठिकाणी सोडून दिले जाते. सप्टेंबर 2022 पासून आतापर्यंत ओपीडीमध्ये 15 हजार 163 प्राण्यांवर उपचार केले आहेत, तर 2 हजार 77 प्राण्यांना गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर आयपीडी विभागामध्ये उपचार केले आहेत. तसेच आवश्यक त्या लसीचे डोस महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जातात. तसेच बरे झालेले कुत्रे व मांजर दत्तक घेण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांना ते दिले जाते