भुईंज – किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या 2023-24 या वषांतील गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी (दि. 30) दुपारी 1 वाजता विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, शासनाने साखर कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार किसन वीर आणि किसन वीर-खंडाळा या दोन्ही कारखान्यांच्या गाळपास 1 नोव्हेंबरला सुरुवात करण्यात येणार आहे. दोन्ही कारखान्यांसाठी आवश्यक असणारी तोडणी यंत्रणा कार्यस्थळावर दाखल झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाची तोड नियमाप्रमाणे आणि वेळेवर होणार आहे.
गळीत हंगाम शुभारंभास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, किसन वीरचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि दोन्ही कारखान्यांच्या संचालकांनी केले आहे.