सागर येवले
पुणे -“अरे ती मोपेड आहे, वयाच्या 16 वर्षानंतर चालवली तरी चालते, असा अनेक पालकांचा समज आहे. मात्र, पालकांनो सावधान…ती मोपेड असली तरी दुचाकी 50 सीसीची आहे का? नसेल तर तुमच्या पाल्याला वाहन चालवायची परवानगी 18 वर्षे झाल्यानंतरच. लाडापोटी दुचाकी देऊन संकटे ओढवून घेऊ नका. मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक परिसरामध्ये वाहन चालवण्याची परवानगी नाही.
तर 16 वर्षे वयाच्या व्यक्तींना 50 सीसीपेक्षा जास्त नसलेल्या इंजिन क्षमतेचे वाहन चालवण्यास परवानगी आहे. मात्र, आज हा नियम खुलेआम पायदळी तुडवला जातो. त्यामध्ये काहींना माहीत असून नियमांकडे दुर्लक्ष करतात, तर काहींना नियमांची कल्पनाच नाही. अनेकांचा गैरसमज झाला की, मोपेड गाडी (गियर नसलेली) ही वयाच्या 16 वर्षे पूर्ण झाल्यानंतर चालवू शकतो.
त्यामुळे दहावीचे शिक्षण नुकतेच पूर्ण होताच, पालकांकडून मुलांना कॉलेजला जाण्यासाठी मोपेड गाडी घेऊन दिली जाते. 16 वर्षे पूर्ण झाल्यावर परवाना काढण्यासाठी आरटीओत जातात, त्यावेळी मुले व पालकांना नियमांची माहिती मिळाल्यावर काही पालक मुलांना गाडी देत नाही. मात्र, काही पालक लाडापोटी या नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि मुले विना परवाना वाहन चालवितात. त्याचा परिणाम अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे पालकांनीही या नियमांकडे गांभीर्य लक्षात घेऊन 18 वर्षानंतरच मुलांना प्रशिक्षित करून वाहन चालविण्यास द्यावे, असे आवाहन वाहतूक पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.
दरवर्षी सुमारे 900 अपघात
शहरात दरवर्षी 800 ते 900 अपघात होतात. 2022 मध्ये 872 अपघातात 325 जणांचा मृत्यू तर 507 गंभीर जखमी आणि 78 किरकोळ जखमी झाले. तेच 2023 मध्येही पहिल्या सहा महिन्यात अपघाताची संख्या जवळपास साडेसहाशे इतकी असून, दोनशे जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अल्पवयीन मुलांच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघातांचाही समावेश आहे. त्यामुळे आपली मुले सुरक्षित राहावी, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, याचा विचार पालकांनी करावा.
“50 सीसीची वाहने वयाच्या 16 व्या वर्षी चालविण्याची परवानगी होती. मात्र, आज बाजारात मोपेड गाड्या ह्या शंभर किंवा त्यापेक्षा अधिक सीसीच्या आहेत. त्यामुळे वयाच्या 16 वर्षांनंतर ही वाहने चालविली तर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते.” -संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे