पुसेगाव – पुण्याच्या बालेवाडीतील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात खटाव पंचायत समितीच्या उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांच्या संकल्पनेतून ज्ञानरचनावादी वर्ग या विषयाचा अभिनव स्टॉल उभारण्यात आला आहे. प्रदर्शनामध्ये संपूर्ण देशभरातून 225 स्टॉल निवडण्यात आले असून खटाव पंचायत समितीच्या स्टॉलचा विविध मान्यवरांकडून गौरव होत आहे.
राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजितसिंह देवोल, भारत शिक्षण मंत्रालयाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. श्रीधर श्रीवास्तव तसेच विविध पदाधिकारी अधिकाऱयांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. खटाव तालुक्यामध्ये १०० टक्के प्रगत वर्ग करण्यासाठी ज्ञानरचनावादी अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने राबवली जात असून वर्गआरेखन, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, साहित्य पेट्यांचा प्रभावी वापर, प्रकाशयोजना, आरेखनयुक्त व्हरांडा, गोष्टींचा शनिवार, इंग्रजी स्टोरी, विषय कोपरे
परसबाग असे विविध उपक्रम राबवून तालुक्यातील प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावादी वर्ग तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी हे वर्गवातावरण अत्यंत प्रभावी ठरत असल्याने खटाव पंचायत समितीमार्फत यशस्वी उपक्रम म्हणून रचनावादी वर्गाची अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिकृती या प्रदर्शनात उभारण्यात आली आहे. त्यामुळे हा स्टॉल विद्यार्थी, अधिकारी यांच्यासाठी विशेष आकर्षण बनला आहे. रणजीतसिंह देवोल यांनी स्टॉलला भेट देऊन ज्ञानरचनावादी वर्गरचनेची संकल्पना स्टॉलच्या प्रतिनिधी शिक्षकांकडून समजावून घेत रचनावादी वर्ग उपक्रमाचे विशेष कौतुकही केले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विविध अधिकारी, विविध जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, विषय मंडळाचे राज्यस्तरीय अधिकारी, विविध राज्यातील उच्चस्तरीय अधिकारी, तसेच हजारो विद्यार्थी आणि पालकांनी स्टॉलला भेट दिली आहे. प्रदर्शनादरम्यान या स्टॉलमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त अध्ययनाचा अनुभव घेतला.
गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील शिक्षक वर्षाराणी भोसले (शाळा फडतरवाडी), रूपाली सुतार (शाळा भुरकवडी), उज्वला ढाणे (शाळा काटकरवाडी), अजित चव्हाण (शाळा राजापूर), दत्तात्रय गोरे (शाळा बुधावलेवाडी) या उपक्रमशील शिक्षकांनी या स्टॉलची निर्मिती केली असून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या प्राचार्या डॉ. नेहा बेलसरे यांचे या स्टॉलसाठी मोठे सहकार्य लाभले आहे.