खंडाळा – पुणे-बंगळुरू महामार्गावर खंडाळा येथे शुक्रवारी पहाटे भरधाव वेगातील मालट्रकच्या धडकेमुळे मोठा अपघात झाला. एक ट्रकने दोन मालट्रकसह पाच वाहनांना धडक दिली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात सहा वाहने व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झालेे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि.29 रोजी पहाटे चारच्या सुमारास खंडाळा येथे महामार्गावर पुण्याच्या दिशेस भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.-9-सी.यु.-5454) ने दिलेल्या धडकेमुळे इतर दोन ट्रक व तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातानंतर ट्रक महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडील बाजूस असलेल्या एका हॉटेलला जाऊन धडकला. या सर्व घटनेमध्ये टेम्पो क्रमांक (एम.एच -11 ए.एल.-3301), टाटा पिकअप (एम.एच.-23 ए.यु.-4097), मालट्रक (के.ए.-22- बी-2870), मारुती वाहन (एम.एच.-9 एफ.बी.-2148), चारचाकी वाहन (एम.एच.-20 -एफ.यु.-9450) या वाहनांचे व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या अपघातप्रकरणी मालट्रक चालक संदीप संपत यादव (वय 28, रा. भिलवडी, ता.पलूस, जि. सांगली) याच्या विरोधात अरुण मारुती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.
काळ आला होता पण…
या अपघातामधील भरधाव ट्रक इतर वाहनांना धडक देऊन महामार्ग दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेस असलेल्या हॉटेलवर जाऊन आदळल्याने हॉटेलचा चक्काचूर झाला परंतु या प्रकारामध्ये हॉटेल मधील कामगार पंकज पटेल हा वेळीच आवाज आल्याने सावध होत हॉटेलबाहेर आला व त्याचा जीव वाचला.