सातारा – सातारा एक्सप्रेस धावपटू सुदेष्णा शिवणकर भुवनेश्वर (ओडिसा) येथे सुवर्ण कामगिरी बजावत सुवर्ण पदकावर मोहर उठवली असून सलग दुसर्यांदा देशातील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा बहुमान पटकावत क्रीडाक्षेत्रात जिल्ह्याची मान उंचावली आहे. या यशामुळे तिचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून सलग दोन वर्षे सुवर्ण पदक पटकावणारी शिवाजी विद्यापीठाची ती पहिली खेळाडू ठरली आहे.
भारत आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेमध्ये भुवनेश्वर येथे सातारा एक्सप्रेस शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करत असून सुदेष्णा शिवणकर हिने 100 मीटर धावणे क्रिडा प्रकारात सुवर्णपदक मिळवलेले आहे. भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत देशातील सर्वांत वेगवान धावपट्टु होण्याचा तिने सलग दुसर्यांदा किताब पटकावला आहे. गतवर्षीच्या कामगिरीचे सातत्य राखत सुदेष्णाने 100 मीटर धावणे क्रिडा प्रकारात सलग दुसर्यांदा भारतीय विद्यापीठ स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवले आहे.
सलग दोन वर्ष सुवर्ण पदक मिळवत उत्तुंग कामगिरी करणारी सुदेष्णा ही शिवाजी विद्यापीठाची पहिलीच खेळाडू आहे. मागील वर्षी चायना-चेंगडु येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत सुदेष्णाने भारताचे प्रतिनिधत्व केले होते. सुदेष्णा ही गेले 6 ते 7 वर्ष सातत्याने मैदानावर सराव करत आहे. अथक परिश्रम व सरावाचे सातत्य यामुळे सुदेष्णाने आजपर्यंत देशात आपल्या कामगिरीचा दबदबा कायम ठेवला आहे.
सुदेष्णाला निवृत्त तालुका क्रिडाधिकारी बळवंत बाबर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तिच्या या उत्तुंग कामगिरी बद्दल यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव, स्पोर्ट डायरेक्टर शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.