पुसेसावळी/औंध – वरुड (ता. खटाव) येथे साळुंखेवस्तीमधील ईश्वर दत्तात्रय जगदाळे (वय 60) याच्या गुराच्या गोठ्यालगत छापा मारुन औंध पोलीसांनी 2,04,500 रुपये किमतीचा गांजा व लागवड केलेली गांजाची झाडे असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एस. एम. झारी यांनी पोलीसांत तक्रार दिली असून संशयितास अटक करण्यात आली आहे.
ईश्वर दत्तात्रय जगदाळे त्याच्या गुरांच्या गोठ्यालगत ओढयाच्या कडेला गांजाची झाडे लावून आणि त्याची विक्री करीत असल्याबाबतची माहिती औंध पोलीसांना मिळाली होती. ही कारवाई करतना पोलीसांनी वेषांतर करुन गुरांची माहिती विचारत गोठ्याजवळ पाहणी करून गांजाची झाडे शोधून कारवाई केली. औंध पोलीस ठाण्याची आतापर्यतची सर्वात मोठ्या रकमेची गांजाची कारवाई केली आहे.
कारवाईमुळे औंध परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या लोकांना चाप बसला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धोंडीराम वाळवेकर, उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहाय्यक फौजदार पी. एस. पाटोळे, डी. वाय. देवकुळे, आर. एस.बनसोडे, पी. डी. भुजबळ, एम.आर. जाधव, एस. एम. झारी, एम. व्ही. कदम, एम. के. फडतरे, एन. पी. कोळी यांनी कारवाईत सहभाग घेतला. गंगाप्रसाद केंद्रे तपास करत आहेत.