सातारा -कोरेगाव शहरातील गणेशनगरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात पत्र्याची तीन घरे जळून भस्मसात झाली. दहा वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे प्राण वाचले. या स्फोटात मात्र तीन कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवीत शिकणारा आराध्य सोमनाथ पवार आपल्या तिसरीतील लहान बहिणीसह घरामध्ये जेवण करत होता. यावेळी त्याची आजी गॅसवर स्वयंपाक करत होती. आजी खाली बसून भाकरी करत असताना अचानक गॅसच्या पाईपने पेट घेतल्याचे आराध्यच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान दाखवून आजी व बहिणीला प्रथम घरातून बाहेर पडायला सांगितले व घरात बांधलेल्या शेळीसह तो पटकन घरातून बाहेर पडला.
सर्व जण घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पत्र्याची तिन्ही घरे जळून खाक झाली. या स्फोटात तीनही घरातील कौटुंबिक साहित्यसह मुलांचे शैक्षणिक साहित्य व पवार कुटुंबाचे सलून व्यावसायाच्या साहित्याचे नुकसान झाले. या दुर्घटनेत वित्तहानी झाली असली तरी पाचवीत शिकत असणाऱ्या चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे व शेळीचे प्राण वाचले.
घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. शाळकरी विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अरुण घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर दिला. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी आराध्यचे कौतुक केले.