संजय गवारी : आंबेगावात 60 लाख रुपयांचे वाटप सुरू
मंचर – आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळाने घरांचे, तसेच शेतीचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी सुमारे 60 लाखांचा निधी मंजूर केला असून, तहसीलदार यांच्यामार्फत पंचनामे तपासणी करून निधीच्या वाटपाचे काम सुरू केल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी दिली.
2020 मध्ये चक्रवादळाने घरांची पडझड, घरांचे पत्रे उडणे, भिंत कोसळणे, कौले फुटणे अशा प्रकारे नुकसान झाले होते. याची पाहणी करून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सबंधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची मागणी केली होती.
यामध्ये काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, परंतु नंतरच्या काळात करोनासारखी महामारी सुरू झाल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना निधी न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले होते.
ही बाब दिलीप वळसे पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधी मंजूर केला.