मायणी – डॉ. श्यामसुंदर मिरजकर संपादित ‘कविता : रूपबंध आणि आशयद्रव्य’ या ग्रंथास शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालयात संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या १३व्या अधिवेशनात आ. अरुण लाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश पोळ, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत जाधव, सचिव डॉ. मांतेश हिरेमठ, प्राचार्य डॉ. आर. एस. डुबल, क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघास दिलेल्या पन्नास हजार रुपये देणगीच्या व्याजातून दरवर्षी नैतिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या साहित्यकृतीस हा पुरस्कार दिला जातो. ‘कविता :रूपबंध आणि आशयद्रव्य’ हा प्राचार्य डॉ. सयाजीराव मोकाशी गौरव ग्रंथ असून त्यामध्ये कविता या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप, आशय व शैली यांविषयी अनेक अभ्यासकांनी लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी संपादित केलेले आहेत.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव एस. डी. कुबेर, प्रभारी प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद आदी मान्यवरांनी डॉ. मिरजकर यांचे अभिनंदन केले.