कुटुंबातील चौघांना शॉक; एकाचा मृत्यू, पत्नी, दोन मुले जखमी
सातारा – दिवाळीसाठीची रोषणाई करताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने चिमणपुरा पेठेतील कारंडबी नाका परिसरातील सुनील तुकाराम पवार (वय 40) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री घडली. यामध्ये पवार यांची पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पवार कुटुंबीय चिमणपुरा पेठेतील कारंडबी नाका येथे राहते. दिवाळीसाठी सुनील पवार हे शनिवारी (दि. 30) सायंकाळी घरासमोर आकाश कंदिल व लाइटच्या माळा लावत होते. हे काम करतानाच घरासमोरुन गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीमुळे सुनील पवार यांना शॉक बसला.
हे लक्षात येताच पत्नी ज्योती त्यांना सोडवण्यासाठी पुढे गेल्या असता, त्यांनादेखील जोराचा शॉक बसला. शॉक बसून आई-वडील थरथरत असल्याचे पाहून मुले श्रवण व ओम यांनी त्यांना वाचवायला धाव घेतली. त्यांनाही शॉक बसला. ही माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांना सोडवले.
नागरिकांनी सुनील पवार यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती सुनील पवार यांना मृत घोषित करण्यात आले. पत्नी ज्योती, मुलगा श्रवण आणि ओम हे जखमी आहेत. या घटनेची प्राथमिक नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार शिखरे तपास करत आहेत.