परळीच्या फार्महाऊसवर रणनीतीचा होमवर्क; घार्गे प्रकरणावरही चर्चा
सातारा – राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी जिल्हा बॅंक निवडणुकीच्या रणनीतीवर परळी येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्या फार्महाऊसवर खलबते केली. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. निवडणुकीच्या रणनीतिवर दिवाळीपूर्वी “होमवर्क’ करण्यात आल्याची चर्चा आहे. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या विषयीही चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खा. उदयनराजेंना सामावून घेण्यास अन्य नेत्यांनी नकार दिल्याने, ते आक्रमक होऊन जिल्हा बॅंकेच्या संचालकांवर टीकेची झोड उठवत आहेत. या पार्श्वभूमीवर परळी, ता. सातारा येथे राजू भोसले यांच्या फार्महाऊसवर ना. रामराजे, आ. शिवेंद्रराजे,प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर. नितीन पाटील, अनिल देसाई, यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक राजेंद्र राजपुरे व काही संचालकांची खलबते झाली.
एका गुरुजींच्या सत्कारानिमित्त एकत्र आलेल्या या मंडळींनी फार्महाऊसवर एकत्र जेवण करत जिल्हा बॅंकेची रणनीती ठरवली. बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. काही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अडचण होऊ नये, म्हणून विरोधात अर्ज भरलेल्यांची मनधरणी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत.
सर्वसमावेशक पॅनेलचे उमेदवार 7 नोव्हेंबरला निश्चित करून, पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये या नेत्यांना कितपत यश येते, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून न घेण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे उदयनराजे संतप्त झाले आहेत. ते गेल्या आठवडाभरापासून विद्यमान अध्यक्ष व संचालकांवर टीकेची झोड उठवत आहेत.
उदयनराजे गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी व आ. शिवेंद्रराजेंनी तीन उमेदवार तयार ठेवले आहेत. फार्महाऊसवर झालेल्या चर्चेसंदर्भात विचारले असता, परळी खोऱ्यातील गुरुजींच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यानंतर राजू भोसले यांच्या फार्महाऊसवर जेवणाचा बेत होता, आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले; परंतु अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.