पुणे – शहरातील करोनाची स्थिती आटोक्यात असली तरी दरवर्षी चिमुकल्यांसाठी महापालिकेकडून घेण्यात येणारी किल्ले स्पर्धा यंदा न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात अद्याप लहान मुलांचे करोना लसीकरण झालेले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.
महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त संभाजीबागेच्या परिसरात किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून महापालिकेकडून आयोजिली जाते. यात शहरातील विविध वयोगटांतील मुलांकडून तीस ते चाळीस विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. यात रायगड, सिंहगड, जंजीरा, प्रतापगड, पुरंदर, विजयदुर्ग असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ही स्पर्धा घेतली गेली नाही. मात्र, यंदा शहरात जवळपास 90 टक्के निर्बंध शिथील असल्याने ही स्पर्धा भरविली जाण्याची शक्याता व्यक्त केली जात होती. मात्र, तिसऱ्या लाटेबाबत असलेली साशंकता तसेच मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसल्याने स्पर्धा घेण्यात येणार नाहीत.