फलटण – शेतजमिनीवर झोपडी टाकल्याच्या रागातून पिंप्रद, ता. फलटण येथे झोपडी पेटवून दिल्याने लागलेल्या आगीत झोपलेल्या महुली (मौली) झबझब पवार या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रद गावच्या हद्दीत सौ. कल्पना अशोक पवार (वय 45 रा. अलगुडेवाडी ता. फलटण) या महिलेने खरेदी केलेली जमीन गट नं. 3 ही वहिवाटू नये, म्हणून तिने या जमिनीवर टाकलेली झोपडी काल (दि. 10) रात्री 11 वाजता कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. पिंप्रद) या संशयितांनी पेटवून दिली.
या झोपडीमध्ये झोपलेल्या महुली (मौली) झबझब पवार या महिलेचा या आगीत मृत्यू झाला. या महिलेचा खून करून आपल्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सौ. कल्पना पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.