कोणाताही गाजावाजा न करता महिनाभरात 17806 जणांवर कारवाई
पिंपरी – कोणताही गाजावाजा न करता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात हेल्मेट सक्ती लागू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात 17 हजार 806 दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्याने दंडात्मक कारवाई करून 89 लाखांचा दंड वसूल केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे पूर्वी सायकलींचे आणि आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. यापूर्वी पुणे शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा अनेकदा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मात्र प्रत्येकवेळी दुचाकीस्वारांकडून त्यास तीव्र विरोध झाला. आधी शहरातील रस्ते ठीक करा आणि मगच हेल्मेट सक्ती लागू करा, असा उपदेशही देण्यात आला.
प्रत्येकवेळी हेल्मेट सक्ती बारगळली. हेल्मेटसक्तीची घोषणा होताच विरोध तीव्र होऊ लागतो. बहुधा याचाच बोध घेत पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी कोणताही गाजावाजा न करता हेल्मेट सक्ती लागू केली आहे. छुप्या मार्गाने ही सक्ती लागू केल्याने नागरिकांमधून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.
दोन वर्षांत 598 प्राणांतिक अपघात
पिंपरी चिंचवड शहरातून पुणे नाशिक, पुणे मुंबई आणि मुंबई बंगलोर हे तीन प्रमुख महामार्ग जातात. या मार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने येथील वाहनांचा वेगही जादा आहे. अतिवेगामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही अधिक आहे. 2019 या वर्षात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत 319 प्राणांतिक अपघात झाल्याची नोंद आहे.
तर 2020 मध्ये करोनामुळे लॉकडाऊन असल्याचे प्राणांतिक अपघाचे प्रमाण थोडे कमी झाले. गेल्या वर्षभरात 279 प्राणांतिक अपघातांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात 598 प्राणांतिक अपघात घडले आहेत. प्राणांतिक अपघातांमध्ये बळी गेलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. तसेच बळी गेलेल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईत मोठी वाढ
अपघातातील बळींचे प्रमाण करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लघंन केल्यास काही वेळाच हेल्मेटबाबत दंड आकारण्यात येत होता. आता मात्र सरसकट कारवाईला वाहतूक पोलिसांनी सुरवात केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये एक हजार 53 जणांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई केली होती. तर यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात तब्बल 17 हजार 806 जणांवर कारवाई केली आहे. हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. त्यानुसार यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 89 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दुचाकीस्वारांना दंड आकारणे हा आमचा हेतू नाही. अपघातातील बळींचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हेल्मेट सक्ती लागू केली आहे. त्यातून प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी हाईल.
– श्रीकांत डिसले, सहायक आयुक्त, वाहतूक पोलीस