मुंबई – भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जांच्या व्यवसायात 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिसेंबर 2020 मध्ये गृहकर्जांमध्ये सर्वात जास्त सोर्सिंग, मंजूरी, वितरण आणि वाढ साध्य केली आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, वैयक्तिकृत सेवेला तंत्रज्ञानाची जोड देणे ही सध्याच्या परिस्थितीवरील एक गुरुकिल्ली आहे. गृहकर्जांचे वितरण अधिक कार्यक्षमतेने व्हावे, याकरीता विविध स्वरुपाचे डिजिटल उपक्रम सुरू करण्याचे काम बॅंक करीत आहे. यामध्ये एंड-टू-एंड डिजिटल सोल्यूशन देणारा रिटेल लोन मॅनेजमेंट सिस्टीम (आरएलएमएस) हा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म विकसीत करण्यात येत आहे.
व्यक्तींच्या गरजांनुसार गृहकर्जांची रचना बॅंकेने केली आहे. एसबीआयने मंजूर केलेल्या प्रकल्पांसाठी गृहकर्जे घेणाऱ्या ग्राहकांना बॅंकेने मार्च 2021पर्यंत प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.
गृहकर्जांसाठी सह-कर्ज देण्याचे (को-लेन्डिंग) मॉडेल सुरू करण्यासाठी बॅंक तयार होत आहे. यातून असंघटित क्षेत्रातील कर्जवितरणासही चालना मिळण्यास मदत होईल. घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना घरांचे अधिक पर्याय देता यावेत, याकरीता बिल्डर्सशी सहकार्य वाढिण्यावर एसबीआय भर देत आहे.