सातारा -रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठांतर्गत असणाऱ्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून चौथ्या पुनर्मूल्यांकनात स्वायत्त महाविद्यालय या प्रवर्गात “ए प्लस प्लस’ दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे “आयक्यूएसी’चे कॉर्डिनेटर प्रा. डॉ. गणेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. जाधव म्हणाले, “”वेगवेगळ्या सात कसोट्यांच्या आधारावर महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. आणि त्यासंबंधीचा अहवाल बंगळुरु येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून संस्थेला सादर केला. त्रिस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करून सादर केलेला अहवाल आणि महाविद्यालयाने सादर केलेला एसएसआर याच्या आधारावर महाविद्यालयाचे मूल्यांकन करून सात सप्टेंबर रोजी महाविद्यालयाला “ए प्लस प्लस’ हा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.” वाणिज्य महाविद्यालयाला नॅकपियर टीमच्या तीन सदस्यांनी 21 व 22 ऑगस्ट रोजी भेट दिली होती. या टीममध्ये सौराष्ट्र विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे डीन डॉ. संजय भयाने, हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठातील डॉ. नसीबसिंग गिल, तमिळनाडूतील आर्टस आणि सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीलप्पन रमण कोंदू यांचा समावेश होता.
या समितीला प्रा. गणेश जाधव यांनी येथे असणाऱ्या सोयीसुविधांची तपशीलवार माहिती दिली. हा कॅम्पस संपूर्णपणे वाय- फाय असून येथील प्राध्यापकांनी पाच पेटंट रजिस्टर केली आहेत. अशा विविध निकषांवर महाविद्यालयाला “ए प्लस प्लस’ दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. महाविद्यालयाच्या या यशाचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव डी. एन. पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य ज्ञानदेव मस्के, उपप्राचार्य डॉ. विठ्ठल सावंत यांनी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.