पुणे (संजय कडू) – शहर पोलिसांनी तब्बल 2,600 गणेशोत्सव मंडळांना मंडप आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले आहेत. याद्वारे हालचालींचे चित्रीकरण होईल, असे सांगण्यात आले. प्रामुख्याने सुरक्षेच्या कारणास्तव या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंडपांबरोबरच पोलिसांनी टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, फर्गसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि लष्कर परिसरात रस्त्यालगतचे दुकानदार रस्त्यावर तसेच त्यांच्या परिसरात फोकस करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती केली आहे. सध्याचे संवेदनशील वातावरण लक्षात घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले, “पोलीस प्रशासनाकडे आधीपासून रस्त्यांवर 1800 सीसीटीव्ही आहेत. ज्यात स्मार्ट सिटी आणि राज्य गृह विभागाचीही यंत्रणा आहे.
याबरोबरच मंडळे आणि दुकानदारांनी बसवलेले अतिरिक्त कॅमेरे वापरून आम्हाला आमची शहरावरची देखरेख वाढवायची आहे. यामुळे अनेक अनुचित प्रकार टळू शकतील. या कॅमेऱ्यांद्वारे आम्ही शहरातील सण-उत्सव काळात सोनसाखळी हिसकावणे, दरोडे, लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यांच्या घटना टाळू इच्छितो. ‘अलीकडेच कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. आम्ही अशा प्रकारच्या व्यक्तींना कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संशयितांवर नजर ठेवण्यास हे सीसीटीव्ही आम्हाला मदत करतील,’ असे पोलीस आयुक्त म्हणाले.
गणेश मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना…
- बॉक्स कमानी तळाशी कापडाने झाकून ठेवू नयेत.
- बॉक्स कमान रस्त्याच्या पृष्ठभागापासून उघडी आणि पायाच्या चार फूट उंचीवर असावी.
- ती उघडी राहिल्यास तेथे कोणीही संशयास्पद पिशवी किंवा वस्तू ठेवू शकत नाही
- शहर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.