फलटण – जातिवाचक शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी निंभोरे, ता. फलटण गावच्या सरपंच सौ. कांचन रमेश निंबाळकर यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत धीरज गौतम जगताप (वय 32, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निंभोरे गावच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्याजवळ सौ. कांचन निंबाळकर यांनी काल (दि. 31 जानेवारी) सकाळी 10 च्या सुमारास मला अडवले. तू ट्रॅक्टर घेऊन येथे का आलास, असे म्हणून, त्यांनी मला नाव विचारले. मी नाव सांगितल्यावर त्यांनी येथे माती उचलायची नाहीस, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली. तू येथे थांबलास तर एका चपाटीत खाली पाडीन, असा दम दिला. याप्रकरणी वाईचे पोलीस उपअधीक्षक भालचिम तपास करत आहेत.