सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साताऱ्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठया जल्लोषात साजरा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीवरून फोनद्वारे उदयनराजेंना ‘राजासाहब जनमदिन की बहुत शुभकामनाये,‘ अशी थेट साद घातली. तर प्रचंड जनप्रेमामुळे भारावलेल्या उदयनराजे यांनी लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा यावेळी जाहीररित्या प्रथमच बोलून दाखवली. कार्यकर्त्याच्या गर्दीमुळे जलमंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.
पोवई नाका ते जलमंदिर अशी तब्बल दोन किलोमीटर लांब अंतरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. खासदार उदयनराजे भोसले यांना यंदाची लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. सकाळी आठ वाजता उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता कल्पनाराजे भोसले व राणीसाहेब दमयंतीराजे भोसले यांनी औक्षण केले. यादरम्यान आजची मोठी घोषणा काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, तेव्हा उदयनराजे म्हणाले, घोषणा हा शब्द चांगला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा या प्रश्नावर ते म्हणाले, इच्छा कोणाची नाही, सर्वांनाच वाटते.
माझीही आहे, या सूचक विधानाद्वारे सातारा लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे उदयनराजे यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्र्याच्या दूरध्वनीमुळे उदयनराजे यांच्या सातारा लोकसभेच्या दावेदारीला बळ मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर दौरा असताना वेळात वेळ काढून जलमंदिरात भेट दिली आणि उदयनराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणजे महायुतीच्या घटक पक्षांनीही उदयनराजे यांना शुभेच्छा देत जणू त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याचे मानले जात आहे.
वाढदिवसानिमित्त जलमंदिर येथे सातत्याने घडामोडी होत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनराजे यांना तलवार भेट दिली. तर उदयनराजे यांनी शिंदे यांना शिवप्रतिमा भेट दिली. यावेळी हास्य विनोद झाले. राजकीय खलबतेही झाली. उदयनराजे यांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. त्यानंतर भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा उदयनराजे यांनी गांधी मैदानावर स्वीकारल्या. तेथेही राजकीय टोलेबाजी करत उदयनराजे यांनी मी जनतेशिवाय नाही, असे भावनिक उद्गार काढले. कार्यक्रमानंतर उदयनराजे जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गांधी मैदानात उपस्थित राहिले, तेव्हा गांधी मैदानावर गर्दीचा महापूर आला.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सुद्धा जलमंदिर ते मोती चौक येथे राजे समर्थकांनी उदयनराजे, आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला. पोवई नाका ते जलमंदिर यादरम्यान मोठी फटाक्यांची माळ लावण्यात आली होती. ही फटाक्यांची आतषबाजी सुमारे दीड तास सुरू होती. या फटाक्यांच्या आवाजाने संपूर्ण सातारा दणाणला. उदयनराजे खुल्या जीपमधून पुन्हा जलमंदिराकडे रात्री उशिरा रवाना झाले. त्यावेळी जलमंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. अनेकांनी बेभान नृत्य करत उदयनराजे यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या.