तळमावले – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून येथील प्राना फाऊंडेशन व कराड येथील गांधी फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला ढेबेवाडी खोऱ्यातील वाड्या-वस्त्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. चार हजारावर नागरिकांनी शिबिरातील विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
डॉ.सौ. प्राची पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत येथील प्राना फाऊंडेशन व कराडच्या गांधी फाऊंडेशनच्या वतीने आणि कृष्णा रुग्णालय, एच.व्ही. देसाई आय सेंटर कराड, ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूर-सळवे यांच्या विशेष सहकार्याने ढेबेवाडी येथे मोफत आरोग्य महामेळावा झाला.
यावेळी डॉ.सौ. प्राची पाटील, वरदीचंद गांधी, जयवंती गांधी, सूरज गांधी, काजल गांधी, उर्वशी गांधी, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, युवा नेते रणजित पाटील, संदीप जाधव यांची उपस्थिती होती. डॉ.सौ. प्राची पाटील म्हणाल्या, समाजकार्याचा वारसा घेवून प्राना फाऊंडेशन महिला सबलीकरण, शैक्षणिक, सामाजिक विकास, पर्यावरण रक्षण व आरोग्य यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. येथील शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, काहींवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. स्त्री सर्वरोग निदान शिबिरात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. मनोसोपचार, जनरल मेडीसीन, शस्त्रक्रिया, बालरोग, नाक-कान-घसा, दंतरोग, स्त्रीरोग आदींच्या तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून तपासणी व उपचार केले.
डॉ.सौ. प्राची पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, तसेच गांधी परिवाराचा उत्कृष्ठ कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बाबुराव खबाले यांनी केले. विभागातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, तसेच प्रानाच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयातही आरोग्य महामेळावा झाला. गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष धिरज गांधी, सूरज गांधी, जयवंती गांधी, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, सरपंच सूरज यादव, रवींद्र माने, मर्चंट सिंडिकेटचे अनिल शिंदे, जितेंद्र पाटील, गणेश यादव, अंकुश कापसे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
विभागातून दोन हजारांवर नागरिकांनी तपासणी करून औषधोपचार व मार्गदर्शन घेतले. त्यातील साडेपाचशे जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदूचे 178 रुग्ण आढळले, पुणे येथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एच. व्ही.देसाई आय सेंटर व कृष्णा हॉस्पिटल कराड, प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले व काळगाव, आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. धिरज गांधी यांनी आभार मानले. सामाजिक बांधिलकी जोपासून प्राना व गांधी फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे.