कराड – सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत सर्व शैक्षणिक संघटना यांच्यावतीने शुक्रवारी कराड येथे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण प्रलंबित प्रश्नाबाबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळाला अभिवादन करुन तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शिक्षक, विद्यार्थी, संस्था चालक सहभागी झाले होते. तहसील कार्यालय येथे संस्थाचालक संघटना व शैक्षणिक संघटना यांच्यावतीने तहसीलदारांना अशोकराव थोरात, सचिन नलवडे व सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनांचे व संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी यांनी प्रशासनास निवेदन दिले.
या निवेदनात महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष द्यावे, यामध्ये गेल्या बारा वर्षापासून शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदे न भरल्यामुळे सर्व शाळा समोर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ठरवण्याचा जुना आकृतीबंध रद्द करून नव्याने करण्यात यावा. शासनाने नवीन शाळा वाटप बंद करावे. शिक्षणावर होणारा खर्च मर्यादित न ठेवता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के करण्यात यावा.
सर्व थकीत वेतनेतर अनुदान द्यावे. ते सध्या अस्तित्वात असलेल्या वेतनानुसार देण्यात यावे. पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक भरती ही विविध न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार करण्यात यावी व शिक्षण संस्थांच्या नेमणुकीच्या हक्कात आडकाठी निर्माण करू नये. सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांना पूर्णपणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात, ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव आनंदराव पाटील-उंडाळकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलावडे, संस्थाचालक संघटनेचे संचालक एस.टी. सुकरे, यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी.ए. पाटील, कालवडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी.ए. थोरात, कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, इम्रान मुल्ला, प्रेम कुमार बिदांगे, सहसचिव अशोक कोठावळे, विलासराव पाटील, प्रदीप माने, महेंद्र भोसले, अंकुश नांगरे, प्रदीप रवलेकर, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे दीपक पवार आदी. उपस्थित होते.
या मोर्चात कराड तालुक्यातील सर्व खाजगी माध्यमिक, प्राथमिक शाळातील शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विद्यार्थी सर्व संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर मोर्चास अशोकराव थोरात, सचिन नलवडे, महिंद्रा भोसले, अंकुश नांगरे, आनंदराव पाटील, अशोक कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधाकर चव्हाण यांनी आभार मानले.