कृष्णानगर – सातारा-लातूर महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असल्याने संगमनगर विकासनगर संगम माहुली येथील रहिवाशांना रोज नवीन संकटाना तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी (दि. 28) रोजी पहाटे महामार्गालगत संगमनगर पोलीस चौकीजवळ असणार्या महावितरणच्या वीजेच्या खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला.
तसेच रोड डिवायडरचे काम चालू असल्याने व त्यालगतच पोल पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडला. तर साइडपट्टीवर खडी असल्याने दुचाकी स्वार घसरत होते. या महामार्गावर वीजेचा खांब उभे करण्याची जबाबदारी मेघा इंजिनियरीग या कंपनीची आहे. सध्या रोड कॉक्रीटीकरण पूर्ण झाल्याने सर्व वीजेचे सर्व खांब महामार्गालगत आहेत. मात्र, सदर कंपनी इलेक्ट्रिक कामास वेळ देत नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात मेघा इंजिनियरीगचे साईट इंजिनियर नायडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की महावितरणकडून आम्हाला 11 के व्ही व 22 के. व्ही. केबल कामासाठी फक्त मंगळवार व एल टी केबल टाकण्यासाठी आठवड्यात मोजकेच तास मिळतात ते सदर कामासाठी अपुरे पडत असल्याने काम खोळंबत आहे.
या अनुशंगाने महावितरणचे अभियंता धनाजी सावंत यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. दरम्यान, महावितरणच्या तांत्रिक कर्मचार्यांनी सदर काम अवघड आहे. मात्र, युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले. ठिम्म प्रशासन व सुस्त ठेकेदार यां दोघामध्ये सामान्य नागरीक भरडला जात आहे.