पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात मनसे पदाधिकाऱ्यांनी अशी बसकन मारली.
कोंढवा – आनंदवन परिसरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिक़ाणी दहा वर्षांपूर्वीच तीन मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या परंतु, या टाक्यांत पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिन्याच आजपर्यंत टाकण्यात आलेल्या नाहीत. याबाबत नागरिकांनी सातत्याने मागणी करुनही याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी नागरीकांसह महापालिका पाणीपुरवठा प्रमुखांच्या दालनात बसकन मारली.
हा प्रश्न सोडवा अन्यथा २५ हजार नागरिक कार्यालयासह परिसरात बसून आंदोलन करतील, असा इशारा दिल्यानंतर येत्या 20 दिवसांत या भागाला पाणी देण्याचे आश्वासन पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिले. त्यानंतरच मनसेचे पदाधिकारी आणि नागरिक कार्यालयाबाहेर पडले.
आनंदवन परीसरातील 26 सोसायट्यांमधील 5 हजार सदनिकांत राहणारे 20 ते 25 हजार नागरीक गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पालिकेच्या पाण्यापासुन वंचित आहेत. परंतु, याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सदर प्रश्न साईनाथ बाबर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मनसे स्टाइलने पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याबाबत शहराध्यक्ष साईनाथ बाबर व शाखा अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी सांगितले की, आनंदवन (महंमदवाडी) परीसरातील रहेजा विस्टा, एलिना लिव्हींग, रहेजा प्रिमियर, कासा सोसायटी आदी मोठ्या 26 सोसायटी असुन या सर्व भागाला पालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. खासगी टँकर पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. पाण्याच्या टाक्याही बांधुन तयार आहेत. मात्र, या टाक्यांपर्यंत पाणी आणण्यात आलेले नाही. येथील नागरीक पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत.
याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक नागरीकांसह पालिका पाणीपुरवठा प्रमुखांच्या दालनात बसकन मारली, त्यानंतर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी येत्या 20 दिवसांत या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शाखाप्रमुख रोहन गायकवाड, स्थानिक रहिवासी तारासिंग, शैलेश जाधव, आयुष राणावत, सुचित रॉय, आयुष मुथा, अलि अजगर शब्बीर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
“शहरात असुनही गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीक पालिकेच्या पाण्यापासुन वंचित राहत असतील तर सर्वसामान्य नागरीकांनी जगायचे कसे, पालिकेने कोणतीही दिरंगाई न करता समान पाणीयोजनेच्या लाईनमधून या भागाला टापाणीपुरवठा करावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.” – साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे
“आनंदवन परीसरातील 26 मोठ्या सोसायट्यांना आजपर्यंत पालिकेचा पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. पुणे महापालिका प्रशासनाचे हे मोठे अपयश आहे, पालिकेने तत्काळ पाणीपुरवठा सुरु करुन येथील नागरीकांना दिलासा द्यावा. अन्यथा हा प्रश्न मनसे पद्धतीने सोडवू.” – रोहन गायकवाड, शाखाप्रमुख, मनसे