कराड – थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ३१ डिसेंबर रोजी कराड शहर पोलीस ठाणे, वाहतूक शाखेच्या वतीने कराड शहरासह परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी व दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एकूण 20 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्यप्राशन करुन वाहने चालवतात. मद्यधुंद स्थितीत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जातो. या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाणे, वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील कराड-तासगाव मार्ग, कराड-पाटण मार्ग, कराड-विटा आणि कराड-मसूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती.
शहर परिसरातही साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रिथ नलायझर मशिनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला. यामध्ये 15 जण मद्यधुंद स्थितीत वाहने चालविताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या पाच जणांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.