पाथर्डी – तालुक्यातील लोहसर येथे रेशनचे धान्य वाटपावेळी झालेल्या बाचाबाचीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यात सरपंच गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि.12) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेत सरपंच अनिल ऊर्फ अनुराग जगन्नाथ गिते हे जबर मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. गिते यांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याची फिर्याद दाखल केली आहे, तर दुसऱ्या गटातील जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नगर येथील खासगी रुग्णालयात जाऊन गंगाधर ऊर्फ शिवाजी साहेबराव वांडेकर यांचा जबाब नोंदवला. वाडेकर यांच्या जबाबावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री अनिल गिते यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिल ऊर्फ अनुराग जगन्नाथ गिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी लोहसर गावचा सरपंच आहे. माझे वडील जगन्नाथ गिते यांच्या नावावर लोहसर येथे स्वस्त धान्य दुकान आहे. वडील वयस्कर झाल्याने त्यांना मदत म्हणून मी स्वतः स्वस्त धान्य दुकानात धान्याचे वाटप करतो. मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मी स्वस्त धान्य दुकानात गेलो, तेव्हा दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी जमली होती. गर्दी करू नका व सुरक्षित अंतर ठेवून उभे राहा, असे सांगितले. याचा राग येऊन रावसाहेब माधव वांढेकर, महादेव लक्ष्मण वांढेकर, शिवाजी साहेबराव वांढेकर, दिगंबर दामोदर वांढेकर, महेश रावसाहेब वांढेकर, अमोल भाऊसाहेब वांढेकर, वैभव मनसुख वांढेकर, किशोर दामोदर वांढेकर, संभाजी शिवाजी वांढेकर, देवेंद्र बाळासाहेब गिते, सुखदेव श्यामराव गिते, भरत सावळेराम गिते, शिवाजी रामभाऊ वांढेकर, अनिल बाबासाहेब वांढेकर, संजय जिजाबा वांढेकर (सर्व रा. लोहसर, ता. पाथर्डी) यांनी कुऱ्हाड, गज, लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केली.
दुसऱ्या गटाच्या गंगाधर ऊर्फ शिवाजी साहेबराव वांढेकर यांच्या जबाबावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रावसाहेब माधव वांढेकर हे गावातील स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता, त्यांना अनिल गिते यांनी मारहाण केली. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर राघू हिवरे रस्त्यावर भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे अनिल गिते, राजेंद्र जगन्नाथ दगडखैर, बाबासाहेब सबाजी गिते, अक्षय राजेंद्र दगडखैर, हृषीकेश राजेंद्र दगडखैर यांनी मोटरसायकलवरून येवून लोखंडी गज, काठ्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.