पिंपरी – महापालिकेच्या संकेतस्थळावर करोनाबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती देणारा कोव्हीड-19 हा डॅशबोर्ड पुर्ववत सुरू करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर आता मर्यादितच माहिती देण्यात आली आहे.
करोनाबाबतची सर्व सद्य:स्थिती नागरिकांना कळावी, या उद्देशाने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर डॅशबोर्ड सुरू करण्यात आला. त्या माध्यमातून दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची माहिती, किती रुग्णांच्या चाचण्या झाल्या, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले, शहरातील रुग्णालयांमध्ये करोनासाठी उपलब्ध असलेल्या खाटा, ग्राफिक्स, रुग्णांचा वाढत असलेला आकडा, त्याबाबतचा चढता आलेख, होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची माहिती, रुग्णालयनिहाय स्थिती, आत्तापर्यंत झालेल्या करोना चाचण्या अशी अद्ययावत माहिती देण्यात येऊ लागली.
सुरुवातीच्या काळात डॅशबोर्ड “अपडेट’ होत नव्हता. त्यानंतर मात्र डॅशबोर्डचे अपडेटिंग सुधारले होते. मात्र, हा डॅशबोर्ड सोमवारी (दि. 11) अचानकच बंद करण्यात आला. त्यावर केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीच लॉगिन ठेवण्यात आले. याबाबतचे “डॅशबोर्ड बंद, लपवाछपवी सुरू?’ अशा आशयाचे वृत्त “दै. प्रभात’ने 12 तारखेला प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने पुर्ववत डॅशबोर्ड सुरू केला आहे.
दरम्यान, डॅशबोर्डवर आता मर्यादितच माहिती ठेवण्यात आली आहे. बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या, महापालिका हद्दीबाहेरील रुग्णांची स्थिती, होम क्वारंटाईन रुग्ण आणि वयोगटनिहाय रुग्ण एवढीच माहिती सध्या डॅशबोर्डवर दिली जात आहे.