नवी दिल्ली – प्रौढ खेळाडू एल. सरितादेवी हिने महिलांच्या आगामी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दहा वर्षांनी पुन्हा या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली आहे. ती 60 किलो गटात आपले नशीब आजमावणार आहे.
रशियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात दहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. इंडियन ओपन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरजकुमारी (57 किलो), जमुना बोरो (54 किलो) यांच्याबरोबरच मंजु राणी (48 किलो), मंजु बोम्बरिया (64 किलो), स्विटी बुरा (75 किलो) नंदिनी (81 किलो) व कविता चहल (81 किलोवरील) यांनाही जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे. एम.सी. मेरी कोम (51 किलो) व लवलिना बोर्गोहेन (69 किलो) यांना यापूर्वीच चाचणी स्पर्धा न खेळताच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.