पाटण गावात तंत्रज्ञानाचा वापर करत जपली परंपरा
कामशेत – करोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच व्हायरसची संसर्ग साखळी “ब्रेक’ करण्यासाठी जनता कर्फ्युचे रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत काटेकोर पालन करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर पाटण गावात नवजात बालकावर बारावीचे संस्कार चक्क ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
पारंपरिक चालीरितीनुसार बालकाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवीचा पाटा पूजन करतात, तर बाराव्या दिवशी बारावीचे पूजन केले जाते. कुटे कुटुंबातील या बालकाला जन्मानंतर पाचव्या दिवशी घरातील मंडळींनी मुलाच्या आजोळी जाऊन पाचवीचा पाटा पूजन केले; परंतु रविवारी जनता कर्फ्यु असल्याने व तो सर्वांच्या सुरक्षितेसाठीच असल्याची जाणीव ठेवत कुटे कुटुंबीयांनी मुलाच्या आजोळी व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल करत बारवीची विधिवत पुजा केली.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु रविवारी लागू होणार असून, आपण त्यात सहभागी होणे गरजेचे आहे. असे असताना नवजात बालकावर बारावीचे संस्कार करण्यासाठी काय करता येईल. या विचारात असताना आधुनिकतेची जोड देत परंपरा साजरी करता येईल. हा विचार घेऊन कुटे कुटुंबीयांनी दोन दिवस आधीच बारावीचा विधी करण्यास लागणारे साहित्य मुलाच्या आजोळी पाठवुन दिले. बारावीच्या मुहूर्तावर मुलावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात येत विधिवत पुजाही केली. मावळ तालुक्यात व्हॉट्स अपच्या माध्यमातून झालेली ही पहिलीच बारावी असेल.
लहान मुले व वयोवृद्ध यांना कोरोनाच्या संसर्ग लवकर होत असल्याने तसेच त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याने आम्ही परंपरा न मोडता आधुनिक पद्धतीने विधिवत पूजा करत बारावी केली असल्याचे मुलाची आजी अनिता कुटे यांनी सांगितले.