Sanjay Singh elected as President of Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याकडेच राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना एकूण 47 पैकी 40 मते मिळाली आणि त्यांनी बंपर विजय मिळवला.
या क्रीडा संघटनेवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे सर्व वाद निर्माण होऊनही त्यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अशा स्थितीत मागच्या दारातून का होईना कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडेच राहील, असे म्हणता येईल.
संजय सिंह यांना एकूण 47 पैकी 40 मते मिळाली आहेत. त्याची स्पर्धा अनिता शेरॉन यांच्याशी होती. अनिताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी तिला पाठिंबा दिला होता. संजय सिंह यांना 40 तर त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या अनिता शेरॉन यांना 7 मते मिळाली.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष झाल्यानंतर संजय सिंग यांचे दिल्लीत जंगी स्वागत झाले. यावेळी संजय सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, कुस्ती स्पर्धा तातडीने सुरू करण्याचा आपला उद्देश असेल. 31 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा आणि चाचण्या करणार आणि भविष्यात जे काही करायचे आहे ते कुस्ती व खेळासाठी करायचे आहे, असे ते म्हणाले.
VIDEO | Celebrations galore at Brij Bhushan Sharan Singh’s residence in Delhi after his loyalist Sanjay Singh gets elected as the new WFI President. pic.twitter.com/Wgt07PIijT
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023
या वर्षाच्या सुरुवातीला अनेकवेळा निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी, महासंघाच्या निवडणुका गुरुवार, 21 डिसेंबर रोजी झाल्या. दिवसाच्या सुरुवातीलाच निवडणुका झाल्या आणि लगेचच निकालही जाहीर झाला.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंग हे सलग 12 वर्षे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. या वर्षाच्या सुरुवातीला महिला कुस्तीपटूंनी त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते आणि त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. याप्रकरणी दिल्ली पोलीस भाजप खासदाराविरोधातही चौकशी करत आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आणि ते स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा नातेवाईक निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर त्यांनी आपले जवळचे सहकारी संजय सिंह यांना निवडणुकीत उतरवले आणि त्यांना मोठा विजय मिळाला.
या निवडणुकांच्या निकालानंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावर घातलेली बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ऑगस्टमध्ये WFI ला दिलेल्या मुदतीत निवडणुका घेण्यास सक्षम नसल्यामुळे निलंबित केले होते. यानंतर, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कुस्तीपटू तटस्थ खेळाडू म्हणून भाग घेत होते.
MP चे मुख्यमंत्री मोहन यादवही पराभूत, उपाध्यक्ष होऊ शकले नाही…
संजय सिंग हे यापूर्वी उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ते उपाध्यक्षपदासाठी उभे होते. अध्यक्षपदाव्यतिरिक्त 4 वरिष्ठ उपाध्यक्ष, 4 उपाध्यक्ष, एक सरचिटणीस, एक कोषाध्यक्ष आणि दोन सहसचिवांच्या निवडणुका झाल्या आहेत. याशिवाय 5 कार्यकारिणी सदस्यही निवडून आले. दरम्यान, संजय सिंह यांनी याआधीच दावा केला होता की त्यांना बहुतांश राज्यांच्या कुस्ती संघटनांचा पाठिंबा आहे.