मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. याशिवाय त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना देखील धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी धमकी देणाऱ्या मयूर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मात्र मयूर हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे म्हंटले जात आहे. तर त्याने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता, अशी माहिती समोर आली आहे .मयुर शिंदे आपल्या जवळच्या साथीदारांना हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
यावर संजय राऊतांनी गुरुवारी मध्यरात्री ट्वीट केलं आहे. “जाहिरात कांडावरून लक्ष उडवण्यासाठी रचलेला हा बनाव. स्पष्टच दिसतंय. ठाणे परिसरातले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपात आहेत, नाहीतर सध्याच्या शिंदे गटात. हे लोक आमच्यासाठी असं काही करतील, यावर कुणी मूर्खही विश्वास ठेवणार नाही. हे बनावट प्रकरण त्यातलंच आहे”, असं संजय राऊतांनी या ट्वीट करत म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातींवरून राज्य सरकारच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यावरून लक्ष उडविण्यासाठी धमकीच्या प्रकरणात नवं वळण आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आता संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर लावला आहे. या ट्वीटनंतर आता मयूर सिंदे नेमका कोणत्या पक्षाचा? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.