यवत मुक्कामी पालखी सोहळा विसावला : लाखो वैष्णव भक्तिरसात तल्लीन
मनोज खंडाळे
आवडीने भावे हरिनाम घेसी
तुझी चिंता, त्याची सर्व असे,
यवत – टाळ मृदंगाच्या गजरात मंत्रमुग्ध होत लाखो वारकऱ्यांसोबत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. मुक्कामासाठी पालखी यवत येथील काळभैरवनाथ मंदिरातवसावली.
पालखी मार्गातील सर्वांत मोठा 31 किलोमीटरचा टप्पा पार करून पालखी सोहळ्याने हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात प्रवेश केल्याने भक्तीचा महापूर आला होता. सोहळ्याचे दौंडच्या सीमेवर बोरीभडक (चंदनवाडी) येथे 4.40 मिनिटांनी आगमन झाले. यावेळी विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षाव करीत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
पालखीपुढे असलेल्या अश्वाचे दर्शन घेऊन रथामध्ये ठेवलेल्या पादुकांचे दर्शन दुरून घेत भाविक मनोमन धन्य होत होते. यवत ग्रामस्थ व संयोजकांच्या वतीने सकाळपासून पालखीसोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी भाकरी बेसनची व्यवस्था करण्यात आली होती.
पालखीच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव, दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव, महावितरणचे संदीप दरवडे, युवा नेते गणेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, राणी शेळके, योगिनी दिवेकर, उपसरपंच सुभाष यादव, सदानंद दोरगे, नितीन दोरगे उपस्थित होते.
बोरीभडक : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने प्रवेश केल्यानंतर लाखो वैष्णवांनी जयघोष करीत स्वागत केले.
खासदार सुळेंनी घेतला भाकरी करण्याचा आनंद
यवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जेवणासाठी बेसन भाकरीचा बेत केला जातो. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनाही चुलीवर भाकरी करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी चुलीवर भगिनींसोबत भाकरी करण्याचा आनंद लुटला.
23 वर्षे अखंडित रांगोळीची परंपरा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भैरवनाथ विद्यालय खुटबाव यांच्यातर्फे दरवर्षी आकर्षक रांगोळीची सेवा पुरवली जाते. 23 वर्षे ही सेवा मोफत अखंडित दिली जात आहेत. यामध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही रांगोळी लक्षवेधी ठरली.