मुंबई – गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने राऊतांना दिलासा देण्यास नकार देत कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना 31 जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. तब्बल 2 महिन्यांहून अधिक काळ संजय राऊत कोठडीत आहेत.
राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, ईडीने राऊतांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हेच मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. खासदार संजय राऊत यांचा मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात आहे.