मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकरांशी बोलतांना भाजप पक्ष तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तुमची उरली सुरली प्रतिष्ठा वाचवा, असं देखील राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.
संजय राऊत पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ.’ असं असं देखील राऊत यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सतत राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करून देखील आमदार आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भावनिक आवाहन केले. अशात आता शिवसेनेची आज बैठक होणार असून काही महत्वाचे निर्णय यात घेतले जाण्याची शक्यता आहे.