मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालयाने पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. यावर आता संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हणाले कि, मी काहीच सांगत नसून भाजपाचे लोकच मला ईडीची नोटीस आल्याचे सांगत आहेत. कालपासून वाट पाहतोय अजून तरी कोणी आलेले नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तेथेच नोटीस अडकली असावी. तेथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल तर पाहून घेऊ, असेही त्यांनी म्हंटले आहे.
हे सर्व राजकारण असून ज्यांना करायचे आहे ते करु शकतात. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालयाने पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले, त्यांना अंमलबजावणी संचनालयाने चौकशीसाठी 29 डिसेंबर रोजी हजर होण्यास सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी प्रविण राऊत यांच्या पत्नीशी 50 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्या संदर्भात ही चौकसी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वर्षा राऊत यांनी मालमत्ता खरेदीसाठी हे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे. वर्षा राऊत यांना हे दुसरे समन्स बजावण्यात आले आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.