पुणे – ब्रिटनमधून पुण्यात आलेल्या 542 प्रवाशांपैकी अद्याप तब्बल 109 प्रवाशांचा शोध लागला नसून ते “नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा “गॅसवर’ असून त्यांची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांना पत्र दिले असून, या प्रवाशांचा त्यांनी त्यांच्या यंत्रणेतूनही शोध घ्यावा अशी विनंती केली आहे. विमानतळावर दिलेल्या पत्त्यावर हे प्रवासी सापडले नसल्याचेही त्यात नमूद केले आहे.
शहरातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच, ब्रिटनमध्ये या विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. राज्य सरकारने तातडीने ब्रिटनसह यूरोप आणि मध्य-पूर्व आशियातील देशांसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे. त्याचबरोबर गेल्या महिनाभरात या देशांमधून राज्यात आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
ब्रिटीश सरकारने दिलेल्या यादीनुसार, ब्रिटनमधून पुण्यात जवळपास 542 प्रवासी आले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. “ब्रिटनमधून आलेल्या 542 प्रवाशांपैकी सुमारे तीनशे प्रवासी पुण्यातील असून, 290 प्रवाशांचा शोध लागला आहे. त्यापैकी सुमारे 270 प्रवाशांच्या करोना चाचण्या (आरटीपीसीआर) झाल्या आहेत.
106 प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील, तर काही प्रवासी जिल्ह्यातील असून, त्यांचा शोध घेण्याबाबतचे पत्र संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे. मात्र, 109 प्रवासी नोंदणी केलेल्या पत्त्यावर सापडले नसून, त्यांचा फोनही “स्विच ऑफ’ आहे. त्यामुळे या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे’, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.