तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला; मृतात दोघा सख्या भावांचा समावेश

धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या

विनोद मोहिते

इस्लामपूर – दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर परिसरात पुर्ववैमान्यस्यातून दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. यात दोघा सख्या भावांसह तिघांची निर्घृणपणे हत्या झाली. धारधार शस्त्राने झालेल्या हल्लात अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून रविवारी दुपारी तीन वाजता हे हत्याकांड करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. घटनेची नोंद कुंडल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सनी (वय २८) व विकास आत्माराम मोहिते (वय ३२) हे दोघे सख्ये भाऊ आणि अरविंद बाबूराव साठे (वय ५२.सर्व रा. दुधोंडी) अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. तर संग्राम विकास मोहीते (वय १७), आकाश आत्माराम मोहीते ( २८), दिलीप आनंदा साठे (४२ सर्व रा. दुधोंडी) व अन्य एक हे गंभीर जखमी आहेत. त्यांना सांगली शासकीय रूग्णालयात येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुंडल पोलिसांकडून मिळालेली माहिती, दुधोंडी येथे साठे व मोहिते या दोन गटात काल शनिवारी रात्री किरकोळ वाद झाला होता. मयत यांच्या संबंधीत एका मुलीवर अत्याचार झाला होता. त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल आहे. याच पूर्व वैमनस्यातून काल रात्रीचा वाद झाला होता. पोलिसांंनी हा वाद मिटवला होता. संशयित हल्लेखोर आज दुपारी बाराच्या सुमारास गावात आले. वादाची खोटी तक्रार कुंडल पोलिसांत का दिली ? या कारणांवरून संशयितांनी वाद घालण्यास सुरूवात केली. संशयित व्यक्तीमध्ये प्रविण विलास मोहीते, अदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधूकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगिता मधुकर मोहिते, मधूकर धोंडीराम मोहिते यांचा समावेश होता.

आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली? असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर धारदार हत्यारे, लोखंडी पाईप, काठ्या घेत तुम्हाला मस्ती आहे का ? आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यातील सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात अतिरक्तस्राव झाला. त्यानंतर संशयितांनी पलायन केले.

दरम्यान, तिघांनाही उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रांसह दगडाचाही वापर करुन हल्ला करण्यात आला. तासभर ही धुमश्चक्री सुरु होती. दोन्ही गटातील दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. दुधोंडीतील तिहेरी हत्याकांडमुळे जिल्हा हादरला आहे. गावात पोलिसांचा मोठी फौज तैनात करण्यात आली आहे.

नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश..!

मृत झालेल्यांमध्ये सनी व विकास आत्माराम मोहिते या सख्या भावांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी व नातेवाईकानीं केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सांगली येथील शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती. तिथेही मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.