अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर ! जीएसटी कलेक्‍शन 1.16 कोटींवर

नवी दिल्ली  – जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 33 टक्‍क्‍यांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे.

जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजे जून, 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे 92,849 कोटी रुपये होते.

अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै, 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,16,393 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी 22,197 कोटी रुपये, राज्य जीएसटी 28,541 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 57,864 कोटी रुपये (त्यापैकी 27,900 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर जमा झाले) आणि उपकर 7,790 कोटी रुपये जमा झाले.

जुलै, 2021 मध्ये जीएसटी संकलनाचा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 33 टक्के अधिक आहे. यामध्ये 1 ते 31 जुलै पर्यंत भरलेले जीएसटी रिटर्न, त्याच कालावधीसाठी आयजीएसटी आणि मालाच्या आयातीवर जमा केलेला सेस यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात जुलै 2020 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 12,508 कोटी रुपये इतके होते, तर जुलै 2021 मधील जीएसटी महसुलाचे संकलन 18,899 कोटी रुपये इतके झाले. यामध्ये 51 % इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जून 2021 च्या जीएसटी संकलनाच्या प्रेसनोटमध्ये 1 जुलै ते 5 जुलै 2021 दरम्यान दाखल केलेल्या परताव्यांसाठी 4,937 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाचा देखील समावेश करण्यात आला होता. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी पर्यंतच्या उलाढाल असणाऱ्या करदात्यांना परतावा दाखल करण्याचा करण्यासाठी माफी / कमी व्याज अशा विविध स्वरूपात सवलतीचे उपाय देण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.