पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत! तब्बल 49 वर्षांनंतर गतवैभव मिळणार?

बेल्जियमशी होणार महत्त्वाची लढत

टोकियो – भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ येणार या आशा पल्लवित करणारा विजय रविवारी भारताच्या पुरुष हॉकी संघाने मिळवला व ग्रेट ब्रिटनवर 3-1 अशी मात करत तब्बल 49 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदकापासून आता केवळ दोन विजय दूर आहे. तब्बल 4 दशकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून 7-1 असा दारुण पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघात बारा हत्तींचे बळ संचारले व ते या पराभवातून पेटून उठले. 

त्यानंतर अ गटातील 5 पैकी 4 सामने जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. रविवारी उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवताना गतवैभवाच्या आशाही कायम राखल्या. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे, तर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना जर्मनीशी होणार आहे.

1928 साली भारताच्या हॉकी संघाने ऍमस्टरडॅममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर 1932 साली भारताने अमेरिकेचा 24-1 असा दणदणीत पराभव करत सुवर्णयश कायम राखले होते. 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीला 8-1 असे पराभूत केले होते.

ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीतील वर्चस्व भारताने कायम राखले होते. 1948 साली लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत भारताने आपली मक्तेदारी सिद्ध केली होती. 1952 सालच्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर 1956 सालीही भारताने हेच यश मिळवले. 

मात्र 1960 साली भारतीय हॉकी संघाला पराभव स्वीकारत रजतपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताने 1964 सालच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1968 साली भारताला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. 

त्यानंतर भारतीय संघाने 1972 साली पुन्हा एकदा ब्रॉंझपदकावरच समाधान मानले. भारताने अखेरचे हॉकी सुवर्णपदक 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवले होते. त्यानंतर भारतीय हॉकीचे जागतिक वर्चस्व खालावले व अत्यंत निराशाजनक कालखंड सुरू झाला. त्यानंतर आता तब्बल 49 वर्षांनी भारतीय पुरुष संघाने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली असून, चार दशकांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघाला चांगली संधी चालून आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.