पुणे, दि. 30 -मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे “ऍक्सेस कंट्रोल एक्स्प्रेस-वे’द्वारे (ग्रीन कॉरिडॉर) जोडण्यात येणार आहे. यात हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी नवीन मार्गाची आखाणी तयार करण्यात येत आहे. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे अंतर अडीच तासांत पार करता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे केंद्रीय गडकरी यांनी सांगितले. नव्या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूरदरम्यान साडेपाच तासांची कपात होईल. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर 268 किलोमीटर असेल. पुणे, नगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर आठ लेन असतील. तर, ताशी 120 किमी या वेगाने प्रवास करता येणार आहे.
सध्याच्या मार्गापेक्षा 20 किमी अंतर वाढणार असले, तरी नव्या एक्स्प्रेस वेमुळे अडीच तासांत पुणे गाठता येणार आहे. हा रस्ता नगर शहराच्या बाहेरून, पैठण-पाथर्डीजवळून जाईल. पुणे-मुंबई महामार्गावर उर्से टोल नाका आहे. येथून एक रिंग रोड निघतो. तिथून नवा पुणे महामार्ग असेल. तेथून पुढे हा रस्ता थेट बंगळुरूला जाईल. पुणे-बंगळुरू साडेतीन तासांत गाठता येईल, असा नवीन रस्ता तयार होत आहे. या मार्गासाठी सुमारे 12 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
या भागांतून जाणार रस्ता
छत्रपती संभाजीनगर ते पैठण – 55 किमी, आष्टीजवळ 6.5 किमी, नगरमध्ये श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डीतून 126 किमी, पुणे जिल्ह्यांत भोर, पुरंदर, शिरूर, दौंड असा 80.5 किमी असा 268 किमीचा महामार्ग असणार आहे.