केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील चाकण रस्ता, चौफुला परिसरात एका सलून व्यावसायिकाचा खासगी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान चौफुला परिसरात जवळपास सात ते आठ गावच्या नागरिकांचा रोजचा वावर असतो.
करंदी, केंदूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, मांजरेवाडी, वढू बुद्रूक, साबळेवाडी, बहुळ या गावातील नागरीकांसाठी चौफुला हे ठिकाण दैनंदिन व्यवहारासाठी मुख्य बाजारपेठ म्हणून परिचित आहे.या गावातील अनेक नागरिकांचा चौफुला परिसरात मोठ्या प्रमाणात वावर असतो.
त्यामुळे सलून व्यावसायिक करोनाबाधित झाल्याने या सात ते आठ गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. चौफुला परिसरातील अनेक नागरिक या सलून व्यवसायिकाच्या संपर्कात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे थेट सलून चालकच करोना बाधित झाल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
पिंपळे जगताप येथील रहिवासी असलेला पहिलाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. करंदी पाठोपाठ पिंपळे जगतापमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. रामदास देवाखेळे यांनी केले आहे.
रुग्णांच्या घरासभोवतालचा परिसर आणि चौफुला येथील सलून दुकानाचा परिसर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामसेवक छाया साकोरे यांनी दिली.